| बालमानस समजून घेण्यासाठी…
वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता, भावनांचं प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. याबाबत मानसतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतील निरीक्षणे… ……
प्रत्येक मूल वाढवताना आईवडील अनेक प्रयोग करत असतात. स्वतःच्याच मुलांमधला फरक आईवडिलांना जाणवत असतो. म्हणजेच प्रत्येक मूल हे जन्मतः स्वतंत्र बुद्धी, क्षमता, प्रज्ञा घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असतं.मूल वाढवायच्या काही पारंपरिक पद्धतींबरोबर आजकाल नवीन काही प्रयोग करून मुलांमधील क्षमता लक्षात घेऊन त्या वाढविण्याचा प्रयत्न पालक; तसेच शिक्षकही करत आहेत, ही खूप आनंदाची आणि आशादायक परिस्थिती आहे; पण मुलांच्या क्षमता कशा ओळखायच्या आणि त्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतो. मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्याबरोबरच मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाचाही विचार केल्यास हा संभ्रम दूर होऊ शकतो. जशी शारीरिक वाढ टप्प्या- टप्प्याने होते, तशीच भावनिक व बौद्धिक वाढही टप्प्यानेच होते, त्यामुळे हे टप्पे विचारात घेऊन प्रयत्न केल्यास मुलांना वाढविण्याचे काम सोपे होईल.वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता, भावनांचे प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. हे टप्पे लक्षात घेऊन मुलांशी वागण्याची पद्धत अवलंबल्यास मुलांशी सुसंवाद वाढायला मदत होते. मुलांना मिळणाऱ्या पोषक वातावरणाबरोबरच, मानसतज्ज्ञांनी ६ ते १२ वर्षांच्या मुलांबरोबर सातत्याने विविध प्रकारची माध्यमं वापरून काम केल्यास त्याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम दीर्घ काळापर्यंत जाणवतो.ंमुलांच्या जास्त जवळ नेऊ शकणारी माध्यमं म्हणजे खेळ, गोष्टी, गाणी शिवाय मुलांच्या क्षमता विकसनासाठी विशिष्ट उद्दिष्ट ठेवून घेतलेले बौद्धिक खेळ, प्रकल्प गटचर्चा यांचा प्रभावी उपयोग मानसतज्ज्ञ मुलांबरोबर काम करताना करतात.
पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतील प्रज्ञामानस संशोधिकेत सुट्टीच्या काळातील शिबिरादरम्यान मानसतज्ज्ञ हेच काम करतात. अशाच स्वरूपाच्या कामाची मागणी लॉ कॉलेज रस्त्यावरील “परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयांतील (महाराष्ट्र विद्या मंडळाचे) पालक- शिक्षक संघ आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाळिग्राम यांनी ज्ञानप्रबोधिनीतील प्रज्ञा कुलकर्णी यांच्याकडे केली. यातूनच शाळेच्या नेहमीच्या तासांपेक्षा खूपच वेगळ्या स्वरूपाचे तास इयत्ता १ ली ते ४ थी या वर्गांसाठी वर्षभर घेतले गेले.
शाळेच्या पालक-शिक्षक संघातर्फे मुलांच्या नैतिक सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करण्याचा विचार मांडला आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली.
सुरवातीचा काही काळ मुलांशी सुसंवाद वाढविण्यासाठी गाणी, गोष्टी, गंमत खेळ घेतले. कृतियुक्त गाण्यांमधून, गोष्ट पूर्ण करा वगैरेमधून मुलांना मोकळे आणि बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू बौद्धिक खेळांकडे मुलांना वळवायचे होते. त्याची तयारी म्हणून मुलांची स्थिरता, एकाग्रता, अवधानकक्षा वाढवण्यासाठी ओंकार, श्वसनाचे व्यायाम, प्रार्थना याचा उपयोग केला.
काही काळाने मुलांचे बौद्धिक खेळ घ्यायला सुरवात केली. ते बुद्धिमत्तेशी निगडित पैलूंवर आधारित असतात. बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसते. पाठ्य पुस्तकाव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यातही बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू वापरले जातात. गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे १५० पैलू शोधून काढले आहेत. कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, बहुदिश विचार आदी पैलू हे त्यांपैकीच आहेत. या पैलूंचा विकास करण्याच्या हेतूने बौद्धिक खेळ आखले जातात.
नैतिक विकासाचा हेतू ठेवून केलेल्या कामाबरोबरच इतरही काही गरजा जाणवल्या. त्यांपैकी एक म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न. तो सोडविण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेचा प्रकल्प मुलांना करायला दिला. यात स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता इ. विषय होते. यासाठी आणि वर्तन सुधारण्यासाठी “बक्षीस-शिक्षा तंत्र’ वापरले.
खेळ, गोष्टी, गाणी, बौद्धिक खेळ, प्रकल्प आदींच्या वापरातून वर्षांच्या शेवटी मुलांमध्ये जाणवण्यासारखे बदल दिसून आले. उदा. मुलांमधील मारामारी, भांडणे कमी करण्यासाठी गोष्टींमध्ये मारामारी करणारा ससा “मोनू’ कसा वाईट असतो आणि त्यामुळे त्याच्याशी कोणी कसं बोलत नाही; मग तुम्हाला कोणी “मोनू’ म्हटलं तर चालेल का? असा प्रतिप्रश्न करून गोष्टीद्वारे वाईट वर्तणुकीचे परिणाम त्यांच्यावर बिंबवले, आणि काही काळातच मारामारी, भांडणं कमी झाली. बौद्धिक खेळाच्या सवयीमुळे आपणहून विचार करणं सुरू झालं. प्रश्न विचारणं वाढलं. प्रकल्पसदृश बौद्धिक खेळातून मुलांमधील नेतृत्वगुण सहकार्यवृत्तीस कल्पनाशक्ती समस्या निवारणक्षमता आदींचे निरीक्षण करता आले.
या वार्षिक शिबिरातील अनुभवांची पालकांबरोबर देवाण-घेवाण करण्यासाठी आणि मुलांच्या विकासाकडे पालकांनी डोळसपणे बघावे, क्षमताविकासाचा प्रयत्न करावा यासाठी वर्षाच्या शेवटी सुजाण पालकत्व कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेला पालकांचा प्रतिसाद उत्तम होता.
लहान मुलांसाठी आज बाजारात खूप काही मिळतं. खास मुलांसाठीची दुकानं आहेत आणि शॉपिंग मॉल्सही सुरू होत आहेत. कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत आणि पुस्तकांपासून विविध शैक्षणिक साधनांपर्यंत अनेक वस्तू मुलांसाठी सहजगत्या उपलब्ध आहेत. मुलांसाठीचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. इंटरनेटवरही मुलांसाठीच्या वेबसाइट्स आहेत. आणि आता तर मुलांना आकर्षिक करणारे मोबाईल फोनही येत आहेत. या सर्व माध्यमांचा आणि काही खेळण्यांचा शिक्षणासाठी उपयोग होतोच; पण ते क्षणिक ठरण्याची शक्यता असु शकते.
वृत्तपत्रांमध्ये ताज्या बातम्या असतात. प्रासंगिक लेख असतात आणि लहान मुलांसाठीची सदरेही असतात. त्यामुळे मुलांना वृत्तपत्रं वाचण्याची सवय लावली पाहिजे. मूल सहा महिन्यांचे झाल्यापासून त्याला वृत्तपत्र दाखविण्यास सुरवात करावी. त्यामधील रंगीत छायाचित्रांकडे मुलं लगेचच आकर्षित होतात. मुलांना कळू लागलं, की त्यांना वृत्तपत्र द्यायला लागा. त्यातील रंजक बातम्या, लहान मुलांसाठीचा मजकूर वाचवून दाखवा. छोट्यांसाठी असलेली कोडी कशी सोडवायची हे सांगा. बहुतेक वृत्तपत्रांत चित्र रंगविण्यासाठीचे सदर असते. मुलांना चित्र रंगविण्यास सांगा. रंगवलेल्या चित्रांची चिकटवही तयार करा. मुलांसाठीच्या गोष्टींची कात्रणंही काढून ठेवा. त्यांची चिकटवही करा. ही कामं करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. मुलं रमू लागतील आणि वृत्तपत्रांची आणि त्यांची गट्टी होईल. एकदा का सवय लागली, की मुलं मग वृत्तपत्राची, त्यातील बालकांसाठीच्या पुरवणीची वाट पाहू लागतील. आणि एकदा वृत्तपत्र वा पुरवणी हाती आली, की ते लगेचच चित्र रंगविण्यास किंवा कोडी सोडविण्यास सज्ज होतील.वृत्तपत्रांतील “ऍक्टिव्हिटी’ करण्याबरोबरच ते वाचण्याची सवयही लावायला हवी. पालकांनी मुलांसमवेत किमान पाचेक मिनिटं तरी वृत्तपत्र वाचायला हवं. मुलांना मोठ्यानं वृत्तपत्र वाचायला सांगावं. वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांतील व्यक्तींची ओळख करून द्या. हळूहळू मुलं स्वतःच छायाचित्रांतील व्यक्ती ओळखू लागतील. पावसाच्या बातम्या असल्या तर मग मुलांना जलचक्र समजावून द्या. वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर त्यातील महत्त्वाच्या माहितीची कात्रणं काढण्यासही मुलांना प्रवृत्त करा
सुजाता होनप, तनुजा कुलकर्णी, अनया निसळ
|