एक खरी कहाणी

 ही कहाणी आहे, बैल नाही म्हणून पोटच्या गोळ्यांना नांगराला जुंपणाऱ्या दुर्दैवी बापाची अन्‌ हे दृश्‍य नजरेस पडल्यावर  मन  आक्रोंदुन गेलेल्या एक”बाप” माणसाची! या वास्तवाला सामोरा जाणारा शेतकरी नायक आहे भीमराव गोविंद मुळे !.. महानायक मात्र वेगळाच ! ….
..हंगाम आला. बैलजोडी नाही. जवळ पुंजीही नाही. काय करायचे? भीमराव मुळेंना ही चिंता सतावत होती. गात्रे थकलेली. उधार-उसणवारीची सोय नाही. मुलीचे लग्न याच वर्षी झाले. ६१ हजारांच्या हुंड्यासह खर्चाची रक्‍कम एक लाखावर गेली. १५ हजार कमी पडले म्हणून काळजावर दगड ठेवत बैलजोडीही बाजारात न्यावी लागली. बैल विकले. मुलगी सासरी गेली.
भीमरावांना वाटले जबाबदारीतून सुटलो; पण हंगाम आला, तो समस्यांचा डोंगर घेऊनच. पीककर्जाचे प्रकरण बॅंकेत धूळखात पडलेले. गेल्या वर्षी विकलेल्या बियाण्यांची रक्कम अजून मिळालेली नाही. भरीस भर म्हणजे, निवृत्तिवेतनावर आधीच कर्ज काढलेले. १,४०० रुपये हप्ता दरमहिन्याला कापणे सुरू होते. गावात “पत’नसल्याने सावकारही दारात उभे राहू देईना. शेती केली नाही, तर हप्ता भरायचा कोठून?…साऱ्याच समस्या. मात्र, आयुष्यभर खपलेला गडी खचणार कसा? समाजव्यवस्था आणि लोकनिंदा बाजूला सारत मुलांनी खंबीर साथ दिली. शेतात चर काढण्यासाठी भीमरावांनी स्वतः नांगर हाती घेतला. ह्रदयाला चरे पडत असतानाही दोन्ही मुलांना नांगराला “जुंपले”.यातील निवृत्तिवेतनाचा संदर्भ स्पष्ट केला, तर व्यवस्थेतील विदारकता अधिक प्रकर्षाने पुढे येते. भीमराव निवृत्त सैनिक आहेत. ते आग्रा येथे होते. देशासाठी लढणाऱ्या एका वृद्ध सैनिकाला शत्रूने नव्हे, तर परिस्थितीनेच दगा दिला. गारद मात्र केले नाही.”बॉण्ड’ संपला, आयुष्यासोबत रोजची लढाई सुरू झाली… रांगड्या नायकाला मुलांची समर्थ साथ लाभली म्हणून ठीक; अन्यथा शेतीसोबत त्यांचे आयुष्यही करपून गेले असते……अन तो आला!
अशीच एक दुपार. टळटळीत. थोडाफार पाऊस येऊन गेल्याने उकाडाही वाढलेला. शेतीत मुलांच्या सोबतीने भीमरावांची नांगरणी सुरू होती. डॉ. हिंमतराव बावस्कर कारने जात होते. विंचू आणि सर्पदंशावरील ज्यांचे संशोधन जगन्मान्य झालेय, तेच हे डॉ. बावस्कर. वैद्यकीय व्यवसायात पैसा मिळत असला; तरी डॉक्‍टरांचा शेतीवर फार जीव. गावात त्यांनी खास शेत विकत घेतले. शेतात आंब्याची लागवड करायची;  गावातून कलमा आणायला ते निघाले. रस्त्यातच भीमरावांच्या शेतातील दृश्‍य त्यांच्या नजरेला पडले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. थोडावेळ दूरूनच निरीक्षण केले. डॉक्‍टर आणि त्यांची दोन मुले आलिशान कारमध्ये होती, तर भीमराव आणि त्यांची दोन मुले शेतात. रणरणत्या उन्हात. विंचूदंशावर संशोधन करणाऱ्या डॉक्‍टर बावस्करांना शेतातील दृश्‍याने तर अंतर्बाह्य दंश केला. त्यांचे काळीज गहिवरले. व्यवस्थेवर आघात करणारे हे दृश्‍य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आणि दोन्ही मुलांसह थेट शेत गाठले. चोवीसशे रुपयांच्या निवृत्तिवेतनातून पाचसातशे रुपये हाती पडणारे भीमराव संसाराचा गाडा कसा ओढत असतील? काय करायला हवे? डॉक्‍टरांना काळजीने वेढले. घाई असल्याने ते घरी परतले. भीमरावांच्या परिस्थितीने त्यांची झोप उडाली.  सकाळी उठून त्यांनी सारी तळमळ आपल्या मित्राला कळविली. लागलीच तयारी केली आणि ते दोघेही निघाले पुन्हा भीमरावांच्या शेतात. बैलजोडी घेण्यासाठी डॉक्‍टर बावस्करांनी १० हजारांचा चेक भीमरावांच्या हाती दिला, तेव्हा त्यांची तगमग दूर झाली. एक दडपण दूर झाले होते.
नात्यापात्यातील नसतानाही एका बळीराजाची वेदना डॉक्‍टरांनी वेचली.  जुंपलेल्या जोडीचा “भाव’ करण्यापेक्षा त्याचे मोल त्यांनी जाणले. भारत महासत्ता होणार, असा डीडींम पिटणारे आणि त्या नादात आत्ममग्न असलेले स्वयंघोषित पुढारी या घटनेपासून काही बोध घेणार की नाही? डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर, “बॅरिस्टरचं कार्टं’ हे त्यांचे चरित्र यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलेय. त्याला पुरस्कारही मिळालेत. डॉक्‍टरांनी केलेला माणुसकीचा पुरस्कार आपल्या साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. वय झाल्यावरही उमेद न सोडणारे भीमराव या कहाणीचे नायक आहेत, तर दान दिल्यावरही गाजावाजा न करता निमूट निघून जाणारे डॉ. बावस्कर महानायक. आणि हो, भीमराव गोविंद मुळे. वय ६०.  यांनी डॉ. बावस्करांची पाई पाई फेडण्याची हमी स्वतःहून दिली आहे. भीमराव म्हणतात, “”माझी उमर अजून बाकी आहे आणि माझ्या पोरांची जिद्ददेखील !”  

7 Responses to “एक खरी कहाणी”

  1. Gayatri Says:

    खऱ्या, तरीही सुखान्त कहाणीबद्दल धन्यवाद..वैयक्तिक पातळीवर देखील खूप काही करता येतं हे जाणवलं..डॉ. बावस्करांबद्दलचा पूर्वीचा आदर दुणावला.

  2. संगीता Says:

    भारती,

    तुमचा आशयघन आणि सामाजिक जाणिवपूर्ण ब्लॉगज आवड्ले.
    लिहित रहा.

    -
    संगीता

  3. शैलेश श. खांडेकर Says:

    भारती,

    गायत्री आणि संगीता यांच्याशी सहमत आहे. लेखात भेदक वास्तव वर्णन केले आहे. पण, शेवट चांगला झाल्यामुळे ते सुसह्य झालंय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

  4. Bharati R Bhutada Says:

    गायत्री, संगीता,शैलेश्जी,
    आपल्याला लेख आवड्ला, तुम्ही या ब्लॉग ला भेट दिली, त्या बद्द्ल आपले आभार.
    भारती.

  5. abhijit Says:

    This article was  published in Sakal. Did you supplied this to them? Trikon suddha chhan aahe..kramasha: aahe mhanun attach comment karat nahi.

  6. bbharat Says:

    अभीजीत,
    सकाळ्चे व्यवस्थापक श्री.प्रधान हे आमच्या उनीटचेही व्यवस्थापक आहेत. त्या मुळे ही बातमी ५ महीन्या अदोगरच छापली जाणार होती,  का उशीर झाला  कारण मला सांगता येणार नाही,काही दिवसांसाठी मी दुबईत आहे . ही स्टोरी आधी कव्हर होऊ द्यायची न्हवती. ती सकाळ्ला छापल्यावरच ती माझ्या ब्लॉग वर आली.
    भारती.

  7. ashok Says:

    kay bolnar , bolayala jagach nahi
    khupach chhan .

Leave a Reply